अतिरेक्यांची माहिती देणाऱ्याला वीस लाखांचे बक्षीस जाहीर   

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी गुरूवारी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन संशयित आरोपींचे रेखाचित्र जाहीर केले. तीनपैकी दोन अतिरेकी हे पाकिस्तानी नागरिक असल्याचा संशय जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अतिरेक्यांची खात्रीशीर माहिती देणाऱ्यास २० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
 
अनंतनाग पोलिसांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हाशिम मुसा उर्फ सुलेमान, अली भाई उर्फ तल्हा भाई हे पाकिस्तानी नागरिक असल्याचे सांगितले जाते. तर आदिल हुसैन ठोकर अनंतनाग जिल्ह्यातील स्थानिक असल्याचा कयास बांधला जात आहे. या तिघांनी पर्यटकांना त्यांची ओळख विचारली होती. तसेच पुरूष पर्यटकांना वेगळे करण्यात यांनी भूमिका बजावली होती. हे तिघेही पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबाचे सदस्य असल्याचे सांगितले जाते. 
 
दहशतवाद्यांना ज्यांनी जवळून पाहिले होते, अशा पीडितांकडून माहिती घेऊन अतिरेक्यांचे रेखाचित्र तयार केले. या हल्ल्याच्या दरम्यान आणखी काही हल्लेखोर दूरवर उपस्थित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या सर्व दहशतवाद्यांचा शोध सध्या सुरू आहे.पहलगामच्या बैसरन पर्वतातील कुरणावर मंगळवारी २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २५ भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकाची हत्या करण्यात आली. गेल्या काही वर्षांतील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.
 
हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहलगामचा दौरा केला असून घटनास्थळाचा आढावा घेतला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर पाकिस्तानवर काही आंतरराष्ट्रीय निर्बंध लादून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सल्लागार अजित डोभाल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर उपस्थित होते.
 
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने कठोर पाऊले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर पाच मोठे निर्णय घेण्यात आले. या निर्णयानुसार पाकिस्तानी नागरिकांना पुढील ४८ तासांत भारत सोडावा लागणार आहे. याचबरोबर कोणत्याही पाकिस्तानी नागरिकांना  भारतात प्रवेश मिळणार नाही. याचबरोबर केंद्र सरकारने १९६० चा सिंधू जल करारही स्थगित करण्यात आला आहे.

दहशतवाद्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा दिली जाणार : पंतप्रधान मोदी

पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा दिली जाणार, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२४ एप्रिल) बिहार येथील एका जाहीर सभेत बोलताना सांगितले. “मी संपूर्ण जगाला सांगू इच्छितो की भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या पाठीराख्यांना शोधून काढेल आणि त्यांना कठोर शासन करेल. ज्यांनी हा हल्ला केला त्या दहशतवाद्यांना आणि हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा दिली जाईल”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
 

Related Articles